Sep 13, 2009

हिंग : दुर्गंधी राळ !


बुद्ध वाङ्‌मयामध्ये, महाभारतामध्ये हिंगाचे अगदी स्पष्ट उल्लेख आढळतात. उदा. महाभारतात "हिंगु द्रव्ये शाकेषु पलाण्डु लगुनं तथा' असा उल्लेख आढळतो. चरकसंहिता वात, कफ आणि मलावष्टंभ नाहीसा करणारा, तिखट, उष्ण, भूक वाढविणारा, पाचक, रुची आणणारा म्हणून उल्लेख करते. हिंगाची फोडणी हा "हिंदुस्तानी' पाकक्रियेतला खास ठसा आहे. (हा हिंदोस्तान फाळणीपूर्व "अखंड' हिंदोस्तान. त्यात इराणसुद्धा सामील!) याकरिता या अवघ्या प्रदेशाला "हिंगोस्तान' म्हणायला हरकत नाही.

पण याचा पुरवठा पूर्वीपासून तुलनेने मर्यादित असावा. आयातीमधून येणाऱ्या या पदार्थाचे विक्री जाळे मिठाप्रमाणेच हिंदुस्थानभर पसरले असावे; परंतु पुरवठा व्यापारामुळे मर्यादित आणि तुटपुंजा असावा. हिंग वापरणे हे मुख्यतः उच्चवर्गीय श्रीमंतीचे लक्षण असावे. मराठीमध्ये "हिंग लावून विचारणे' असा वाक्‍प्रचार आहे, तो "आदर', "काळजी'दर्शक "मेजवानीतल्या महाग'पणाचा द्योतक आहे आणि सधनाच्या नेहमीच्या खर्चाला "हिंग-तुपावारी' असे म्हटले जायचे. रया आणि वैभव हरविलेल्या श्रीमंत घराण्याचा उल्लेख "हिंगाचे पोते' असा केला जातो. नाजूक माणसाला "हिंगलोण्याची' व्यक्ती संबोधले जाते. त्रासदायक पण तल्लख व्यक्तीला हिंगाचा खडा म्हटले जाते. सासूला हिंग आणि सुनेला कोथिंबीर म्हणतात. त्याची म्हण सांगते, "हिंगासमोर कोथिंबिरीचा काय वास?'

मात्र, उपवासात हिंग चालत नाही! जैनधर्मीय तो वर्ज्य मानतात. याची दोन कारणे असावीत. हिंग वास वाढविण्याकरिता आणि वाहतुकीकरिता शेळ्या-मेंढ्यांच्या कातडीने बनविलेल्या पिशवीमध्ये साठविला जाई. या वेष्टणपद्धतीचे स्पष्ट वर्णन १९०१ पर्यंत पूर्वापार जारी असल्याची नोंद वॅटच्या ग्रंथात आढळते. दुसरे म्हणजे हिंगातली सल्फाइडे कांदा-लसूण तोंडावळ्यास वास देतात. पारंपरिक मांसाहारी पदार्थांच्या पाककृतीमध्ये मांसाला हिंगाची मुरवण सांगितलेली आढळते. उदा. आतड्याचे तुकडे/ अवयव शिजवून केलेली आंत्रिक ऊर्फ "वजेडी' हिंगाच्या पाण्याने धुवावी असेच सांगितलेले आढळते. या मांसाहारी ख्यातीपोटी नैवेद्य आणि "उपवास' आहारातून हिंगाला हद्दपारी मिळाली असावी.

या तीक्ष्ण उद्दीपक सुगंधाचे नाव मात्र सर्व "घाण वास' या अर्थाचेच आढळते. इंग्रजीतले "असा फिटिडा' हे नाव पर्शियन "असा' म्हणजे "राळ' आणि लॅटिन "फिटिडा' म्हणजे दुर्गंधी या दोन शब्दांनी बनला. अलेक्‍झांडरने हा पदार्थ उत्तर आफ्रिकेतल्या "सिलिफियम'चा सहोदर म्हणून नेला होता. ही सिलिफियम नंतर बव्हंशी नामशेष झाली. पण हे "दुर्गंधी राळ' नाव नंतर युरोपीय भाषेत चांगलेच बहुरूपाने पसरले. फ्रेंच, जर्मन, स्वीडिश भाषेत त्यांची नावे "सैतान विष्ठा' या अर्थाची आहेत. याचे मूळ पर्शियन नाव "आंगदान' आहे. हेच नाव जायपत्रीलाही दिले जाते! या नावाचे गावही इराणात होते. मात्र तमिळी "पेरुनगायम' किंवा मल्याळी "कायम' कशावरून आले याचा तपास नाही.

फार काय हिंगु हे संस्कृत नाव कुठून उपजले? कराचीच्या वायव्येला मक्रान टेकड्यांत हिंगुळा नदी आहे. तिथे सरपटत जावे लागते, अशा ठिकाणी "हिंगुलजा' देवीचे मंदिर आहे. हिच्या भक्तांनी रामाचा पराभव केला. रामाने या देवीची प्रार्थना केल्यावर ही देवी प्रसन्न झाली. तेथे अधूनमधून गढूळ पाणी उसळून वर येणाऱ्या विहिरी आहेत. या आसपासच्या भागातून हिंगाचा पुरवठा होत असावा का? की हिंग हेदेखील इतर भाषांसारखे "हीनगंध'चे उपजलेले लघुरूप आहे? अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्‍वर म्हणतात, पाण्याला आपले द्रवरूप कधी टाकून देता येते का? हिंगाला आपल्या स्वतःच्या घाण वासाचा त्रास होतो म्हणून तो टाळता येतो का?

"हिंगु त्रासिला पां घाणि। तरि सुगंधत्व कैचे आणि'; पण तुम्हाला यातले अध्यात्म नको असेल तर उत्तर सोपे आहे, तापल्या तुपावर किंवा तेलावर टाका, की हिंग किती उत्तेजक सुगंध आणते पाहा!

सौजान्य :ई-सकाळ

No comments:

Post a Comment