Jul 8, 2009

प्रिय मधू गानू- विजय तेंडुलकर

पु .लं .चें साहित्य


प्रिय मधू गानू,

तर तुम्ही पंचाहत्तर वर्षांचे झालात.
हे मी इतरांसाठी लिहीत नसून माझ्यासाठीच लिहीत आहे.
तुमच्या वयाचे भान मलाच ठेवण्याची गरज आहे. कारण, तुम्ही ते कधीच मला दिले नाही आणि देणार नाही.
दोनच अपवाद.
एक : तुम्ही रंगवून काळी न केलेली तुमची शुभ्र दाढी.
दोन : पुण्यापासून अंतरावरच्या एका वृद्धाश्रमात तुम्ही जागा घेतली असून तिथे तुम्ही आणि मीनाक्षी यानंतर रहायला जाणार असल्याचे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगत असता. प्रत्यक्षात ते केव्हा घडते? त्याची वाट तुमचे मित्र पाहत आहेत आणि तसे कधी घडेल यावर कुणी कुणी पैजाही लावल्या आहेत. दरम्यान, आठवडयातून कधी इथे तर कधी तिथे अशा फेऱ्या सुरु करून तुम्ही वृद्धाश्रमाचे तुमच्या धावत्या दौऱ्यांसाठी आणखी एक ठिकाण करून, वृद्धाश्रम ते घर, असे नवे धावते दौरे सुरू केले आहेत आणि त्याची मजा तुम्ही 'अभी तो मै जवान हूं' थाटात घेत असता.
याचा अर्थ वृद्धाश्रम हाही तुमच्या वयाचा खरा पुरावा अद्याप तरी नाही.
दाढी हीच खरी.

तर, अगदी बिनचूक बोलायचे तर तुमची दाढी पंचाहत्तर वर्षांची झाली. तुम्ही अजून चोविशीत आहात, असे तुमच्या मित्रांना दिसते. आदल्या जन्मात तुम्ही रेल्वेचे इंजिन असावेत, असे माझ्या मनात क्वचित येऊन गेले आहे.
तुमचा कुठून तरी कुठे तरी जाण्याचा उत्साह मी गेली चाळीस वर्षे (म्हणजे माझ्या वयाची, तुमच्या नव्हे) तरी पाहात आहे. मात्र, कोणतेही रेल्वे इंजिन चाळीस वर्षे एकाच वेगाने विनाविश्रांती धावत राहिल्याची माहिती मला तरी नाही.
अधिक उजवी उपमा द्यायची तर वाऱ्याची देता येईल. तो न थकता सर्व वेळ सर्वत्र वाहत असतो. तुम्हीही न कंटाळता आणि न थकता वाहत असता. कधी पुणे ते मुंबई, कधी पुणे ते कोकणातले कोणतेही गाव, कधी कोल्हापूर, कधी सांगली, कधी सावंतवाडी तर कधी सोलापूर असे तुमचे पोहोचण्याचे ठिकाण जरी बदलले, तरी तुमच्या उत्साहात फरक पडत नाही. कारण ते ठिकाण हे तुमचे खरे उद्दिष्ट नसतेच. तो तुमचा 'भोज्जा' असतो. त्या भोज्ज्याशी पोचलात की काही मिनिटांत तुम्ही परत मूळ ठिकाणी निघण्यासाठी आधी मनाने आणि मग देहाने नव्या उत्साहाने तयार होता. असे भोज्जे ठरवून तुम्ही महाराष्ट्राच्या नकाशावर उभी आडवी शिवाशिवी किंवा पकडापकडी खेळता आणि तुम्ही तुम्हालाच पकडण्याठी धावता असे कधी कधी वाटते. पुन्हा, या 'चर' अवस्थेत तुम्ही ताकद खर्च करण्याऐवजी जमा करीत जाता आणि पोचेपर्यंत तुमच्याकडे परत मूळ ठिकाणी पोचण्याएवढी ती जमा झालेली असते. इतकेच नव्हे तर परत पोचल्यावर नव्या प्रवासासाठी निघायचे म्हटले, तरी तुम्ही तितक्याच उत्साहाने तयार असता.

हा उत्साह कोठून येतो? हे तुमच्या मित्रांना गूढ आहे.
वर्षानुवर्षे 'वाहून' देखील तुमचा याविषयीचा उत्साह ओसरत कसा नाही हे आम्हाला कळत नाही.
त्याअर्थी, तुम्ही वारा नसलात तरी वाऱ्याचे नातलग असलाच पाहिजेत. वारा अशरीरी आहे. त्याला शरीर नसल्याने तो थकण्याचा प्रश्न नाही. पण तुम्ही तर सदेह आहात. देहाला वय असते. तो जुना होतो. नादुरूस्त होतो. थकतो. तुमच्या देहाला हे माहीत नसल्यासारखा तो गेली कित्येक वर्षे तुमच्याबरोबर सर्वभर भटकतो आहे.

हे झाले तुमच्या गतीमानतेबद्दल.
या 'चर' अवस्थेत तुम्ही माणसे जोडता. जोडलेल्यांना पुन्हा भेटता. स्थलकालाने मध्यंतरी पकडलेले अंतर काटून ही रक्तापलीकडली नाती घट्ट करीत असता. जिकडे जाल तिकडे महाराष्ट्रात तुमच्या ओळखी आहेत. तुमच्यावर प्रेम करणारी, तुम्ही यावेत, रहावेत असे वाटणारी माणसे सर्वभर आहेत. ती तुमची वाट बघत असतात. या लोभापायीच असेल कदाचित, पण तुम्हीही क्वचित भोज्जाला शिवून लगेच परत निघण्याची ओढ थोडी तहकूब ठेवून, दोन-चार दिवस एखाद्या गावी, एखाद्या घरी राहता. कदाचित, याला तुमची सहधर्मचारी किंवा अशा दौऱ्यांत बरोबर घेतलेले दोस्तही कारणीभूत असतील. पण राहिलात तरी तुम्ही 'अचर' क्वचितच असता. गावातल्या गावात तुमची भटकंती, ठिकाणे बघणे, कारण शोधून कुठे तरी जाऊन येणे, नवी माणसे जोडणे चालूच असते. मला तर वाटते की, मुक्कामाच्या घरी देखील तुम्ही या खोलीतून त्या खोलीत किंवा या घरातून त्या घरात आणि यातले काही शक्य नसेल तेव्हा मनातल्या मनात जागच्या जागी फिरत असाल. गती हा तुमचा स्वभाव आहे. स्थिर राहणे तुमच्या मनाला मान्य नाही. (झोपेत तरी तुम्ही पूर्णतया बिछान्यातच असता की, स्वप्नात कुठे कुठे जात असता?)

पण असेही दिवस असतात, जेव्हा तुम्ही तुमच्याच घरी असता. म्हणजे जाऊन येऊन असे म्हणू या. तात्पुरती बाहेरगावी नाही तरी गावात, पुण्यात तुमची भ्रमंती चालू असतेच. अगदी घरीही तुम्ही गतीमान्! माणसांची वर्दळ सदैव तुमच्याकडे चालू. माणसे दारातून येतात, तशी खिडकीतून तुमच्याशी संवाद साधतात. दर दोन मिनिटांनी एक या वेगाने फोन येत असतात. एका वेळी दारात, खिडकीत आणि फोनवर माणसे तुमच्याशी बोलताहेत असेही दृश्य दुर्मीळ नसते. एखाद्या मंत्र्याने असूयेने जळावे असा तुमचा जनसंपर्क. हल्लीचे मंत्री स्वत:चीच कामे जास्त करतात, तुम्ही मंत्री नसून इतरांची कामे करता आणि ती आपलीच असल्यासारखी. इतरांच्या कामापायी तुम्हाला सर्व प्रकारची तोशिस पडते. एकेकदा जेवायला उसंत नसते. असेही म्हटले तर चुकणार नाही की, इतरांच्या कामांच्या चिंतांत तुम्ही स्वत:चा आणि पत्नी मीनाक्षीचा विचारदेखील विसरलेले असता. माणसे तुमच्या दारातून रिकाम्या पोटी कधीच परतत नाहीत. प्रत्येकाचा दिलखुलास पाहुणचार झालाच पाहिजे असा तुमचा आग्रह असतो. (त्याचबरोबर कुणाकडे गेले असता कारणाशिवाय चहासाठी थांबायचे नाही - कार्यबाहुल्याचे खरे कारण असतेच. - हाही आग्रह. माझाच प्रदीर्घ अनुभव.) यामुळे घरीच असता तेव्हाही तुम्ही प्रवासात असल्यासारखे धावपळीत असता. याउलट, तुमच्याकडे आलेले स्वत:च्या घरी असावेत तसे निवांत. तसे त्यांनी असावे असा तुमचा प्रयत्न असतो. त्यांना घरी स्थिर करून तुम्ही चपला चढवून दोन-चार कामे करुन आलात, असेही दिसते.

तुमच्या व्यक्तिगत जगातली माणसे कोणत्याही एका प्रकारची, स्तरातली, जातीची किंवा व्यवसायातली म्हणता येणार नाहीत. यात रिक्षावाला येतो आणि संपादकही येतो. शिक्षक येतो तसा शेतकरीही येतो. निकषच शोधायचा तर तुम्हाला अकृत्रिम स्नेहाची ओढ आहे. तोंडापुरते प्रेम, कामापुरते अगत्य आणि खोटेपणा तुम्हाला चालत नाही. तुम्ही मनापासून आणि हातचे न राखता प्रेम देता आणि तसेच तुम्हाला मिळावे अशी तुमची अपेक्षा असते. कोणीतरी जातीवादी माझ्याकडे म्हणाला होता की, गानू कोकणस्थ असून वृत्तीने देशस्थ आहेत; ते तुमच्या या वृत्तीला उद्देशून असावे. देशस्थ दिलदार असतात आणि कोकणस्थ कंजूष, असा प्रवाद या समाजामागे आहे. कंजूष देशस्थ आणि तुमच्यासारखे उदार कोकणस्थ मला भेटले आहेत, हे इथे नमूद केले पाहिजे. माणसांचेच तुम्ही लोभी. परंतु, लेखक, संपादक, गायक आणि नट यांना तुमच्या व्यक्तिगत जगात विशेष पसंती आणि सवलती. नट मित्रांची नाटके, चित्रपट आणि सीरियल तुम्ही आठवणीने आणि आवर्जून बघणार. गायक मित्रांच्या बैठकांना आणि मित्र वक्त्यांच्या भाषणांना तुम्ही आग्रहाने जाणार, पुढची जागा पकडून बसणार आणि भरपूर उत्तेजनपर माना डोलावणार. यातले काही विशेष आवडले, तर ते इतरांनी बघावे आणि ऐकावे म्हणून स्वत: त्याचे प्रयोग लावणार आणि घरचे कार्य असावे तसे त्यासाठी खपणार. संपादक मित्र आहे, या कारणाने तुम्ही त्याचे वर्तमानपत्र बदलले (ही अलीकडली पोलीस खात्यातली आणि वर्तमानपत्रांच्या जगातली नवी चाल. सारख्या बदल्या.) की, तुमच्या घरचे वर्तमानपत्र बदलते.

मात्र, केवळ मित्रकर्तव्य म्हणून तुम्ही या गोष्टी करता असे कोणीही म्हणू शकणार नाही. तुमचा सांस्कृतिक उत्साह या पलीकडला आहे. पुण्याच्या संपन्न सांस्कृतिक जगातले तुम्ही बिनीचे, अथक, हक्काचे आणि नियमीत श्रोते, प्रेक्षक आणि वाचक आहात.

... अपूर्ण
- श्री. विजय तेंडुलकर
('सहवास गुणीजनांचा' या मधू गानूंच्या पुस्तकातील प्रस्तावनेतील काही भाग)

2 comments: