Sep 26, 2009

सुगंधी अत्तर !


कुठल्याही प्रकारचा कुवास किंवा दुर्गंध दूर करण्याची शक्‍ती सुगंधात पर्यायाने अत्तरात असते. अशा वाईट शक्‍तीचा नाश झाल्यावर जे काही घडते ते मंगल असते.

आपले सर्व जीवन श्‍वासाने भरून राहिलेले आहे. छातीत श्‍वास असला तरच आपला वास असू शकतो. आपला पृथ्वीवरचा वास संपला तर उरलेली माणसे एकदा निःश्‍वास टाकून मोकळी होतात.

पहिल्या पावसाचे थेंब जेव्हा भूमीवर पडतात तेव्हा येणारा गंध असतो पृथ्वीतत्त्वाचा. या सुवासाने मन मोहरून उठणार नाही वा मन प्रसन्न होणार नाही असा प्राणी वा मनुष्य सापडणार नाही. अर्थात वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी मातीचे रंग बदलतात व वासही बदलतात, तेथे वास करणाऱ्या लोकांचे आचार-विचार सोयीही बदलतात, त्यांचे राहणीमान व संस्कार बदलतात. त्याअर्थी सुगंधाचा श्‍वासावर खूप मोठा परिणाम होत असावा, नंतर श्‍वासाचा जीवनावर होणारा परिणाम आपल्याला दिसतोच. म्हणून मातीचा जसा वास बदलतो तसेच पृथ्वीतत्त्वातून प्रकट झालेली प्रत्येक वनस्पती वेगवेगळा वास घेऊन प्रकट होते. प्रत्येक वनस्पतीवर येणाऱ्या फळा-फुलांचा सुगंधही वेगवेगळा असतो. त्यावरूनच अन्नाची आवडनिवड तयार होते. एखाद्या ठिकाणचा वास नकोसा वाटतो किंवा त्या ठिकाणी राहण्यात मला रुची नाही असे म्हटले जाते. दुर्वास ऋषींच्या कथा सर्वांना माहिती आहेत. दुर्वास म्हटले की भीती व नकोसे वाटणे या दोन्ही भावना उद्भवत असत. कारण ते अती कोपिष्ट होते. ते काही ना काही निमित्त काढून अनेकांना शाप देत असत. थोडक्‍यात काय तर त्यांचा वास नकोसा वाटत असे. मत्स्यगंधेच्या अंगाला येणारा माशांचा वास जावा म्हणून पराशरांनी तिच्याशी ठेवलेला संबंध ही कथाही परिचितच आहे. मासे खायला कितीही चविष्ट असले, तरी अंगाला माशांचा वास येत असल्यास नकोसाच वाटतो. पराशरांच्या कृपेने मत्स्यगंधेच्या अंगाचा माशांचा वास गेला.

सुगंध आवडत नाही असे या पृथ्वीवर कोणीही नाही. बरेचसे प्राणी तर वासाने पाहतात, वस्तू ओळखतात, आपले भक्ष्य शोधून काढतात. वासाचा माग घेत संबंधित व्यक्‍तीपर्यंत पोचण्याची कला कुत्र्याला शिकवली, तर कुत्रा पोलिस खात्यात मानाचे स्थान मिळवतो.

बऱ्याच वेळा वास अति सूक्ष्म असतो आणि एखादा प्राणी ज्या वेळी दुरूनच वासाने आपले सावज ओळखतो त्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटते. परंतु सूक्ष्म वास हेरून आपला पती वा प्रियकर दुरून ओळखण्याच्या कलेत प्रावीण्य असलेल्या स्त्रियाही कमी नसतात.

देवदेवतांनाही अत्तर प्रिय असते व अत्तर अर्पण करण्याची योजना पूजापाठात केलेली असते. पूजापाठात मांगलिकस्नान असा जेथे उल्लेख असतो त्या ठिकाणी अत्तर अंगाला लावणे वा अत्तर पाण्यात मिसळून देवाला स्नान घाणे अभिप्रेत असते. कुठल्याही प्रकारचा कुवास किंवा दुर्गंध दूर करण्याची शक्‍ती सुगंधात पर्यायाने अत्तरात असते. अशा वाईट शक्‍तीचा नाश झाल्यावर जे काही घडते ते मंगल असते.

फार पूर्वीपासून सर्व जगात अत्तरांचा उपयोग विशेष पद्धतीने केलेला दिसतो. अत्तराप्रमाणेच धूमचिकित्सेमध्येसुद्धा सुवासिक द्रव्यांनाच महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते. फुलांतून तेल काढून घेतल्यावर त्या फुलाचा सुगंध मूळच्या सुगंधापेक्षा कमी होऊ शकतो. चंदनाच्या तेलात फुलांतला सुगंध ओढून घेण्याचा गुणधर्म असल्याने फुलांमधील सुगंध अर्करूपाने चंदनाच्या तेलात शोषून घेतला जातो व हीच आहे अत्तर काढण्याची प्रक्रिया. बहुतेक सर्व अत्तरांमध्ये चंदनाचे तेल हा बेस असतो. म्हणूनच चंदनाचे तेल जसजसे महाग होत गेले, तसतसे त्यात इतर तेले मिसळणे सुरू झाले. फुलांपासून अत्तर बनविण्याची प्रक्रिया किचकट व महागडी असल्यामुळे रासायनिक सुगंध कुठल्यातरी तेलात मिसळून तथाकथित अत्तरे बनविली जाऊ लागली. एखाद्या नैसर्गिक सुगंधात कोणती द्रव्ये आहेत हे आधुनिक परीक्षणांद्वारे शोधून काढून अशी द्रव्ये रासायनिक व कृत्रिम पद्धतीने बनवली जाऊ लागली. हलके हलके अत्तरे मागे पडून त्यांची जागा पर्फ्युम्सने घेतली.

साधारणतः मनगटाच्या खाली, तळहाताच्या मागच्या बाजूला वा कानांच्या मागच्याजागी अत्तरे लावण्याची प्रथा आहे; कारण या ठिकाणांची त्वचा कोमल असल्याने अत्तरे शरीरात शोषली जातात व त्यांचा औषधी उपयोग शरीराला होतो. अत्तराचे दोन थेंब कपभर पाण्यात टाकून प्राशन केल्यास शरीर अंतर्बाह्य सुगंधित होते. परंतु खऱ्या अत्तरांची उपलब्धता कमी झाल्यानंतर रासायनिक रीतीने तयार केलेली द्रव्ये अल्कोहोलमध्ये विरघळवून पर्फ्युम बनविले जाऊ लागले व अशा पर्फ्युमचा सूक्ष्म फवारा अंगावर वा कपड्यांवर उडविण्याची पद्धत रूढ झाली.

नैसर्गिक अत्तर महाग पडते या कारणाने अशा पर्फ्युम्सकडे वळलेली मंडळी अत्तरापेक्षा दसपट वा शंभरपट महाग असलेल्या पर्फ्युम्सच्या नादी लागली. अर्थात अशी पर्फ्युम्स विकणाऱ्या कंपनीचे नाव जितके मोठे, तितकी पर्फ्युमची किंमत अधिक असेही दिसू लागले.

चंदनाच्या तेलाऐवजी अगर-अगरचे तेलही वापरणारे देश आहेत. साध्या ऑलिव्ह ऑईलमध्ये सुगंध मिसळून बनविलेली पर्फ्युम्सही (अत्तरे) प्रचारात असतात.

ज्या ठिकाणी हवेत आर्द्रता हवी असते अशा ठिकाणी पाण्यात अत्तराचे काही थेंब टाकून त्या पाण्याची वाफ सतत खोलीत पसरत राहावी या अपेक्षेने योजना केलेली असते. त्यामुळे अत्तराचा सुगंध येत राहतोच व बरोबरीने खोलीतील आर्द्रताही वाढवता येते. अशा तऱ्हेची योजना असलेल्या जुन्या वस्तू पाहण्यात आहेत. एका छोट्या भांड्यात अत्तरमिश्रित पाणी घेऊन त्याच्या खाली मेणबत्ती लावली असता सर्व खोलीत अत्तराचा मंद सुवास दरवळतो. सध्या अरोमा थेरपी म्हणून अशी योजना केली जाताना दिसते; पण त्यात शुद्ध अत्तरे न टाकता रासायनिक पद्धतीने तयार केलेले रासायनिक सुगंध टाकले तर फायद्यापेक्षा तोटा होण्याचाच संभव अधिक असतो.

साधारणतः मंगल प्रसंगी वा देवादिकांसाठी अत्तरे वापरण्याची पद्धत असते; पण त्या ठिकाणी कृत्रिम पर्फ्युम (अत्तर) मुळीच वापरू नये; कारण अशा कृत्रिम अत्तरात असलेले मूळ पृथ्वीतत्त्वच अशुद्ध असते. अत्तरे उदबत्तीवर चढवून सुगंधी उदबत्त्या तयार केल्या जातात. पण अलीकडे उदबत्त्याही कृत्रिम अत्तरांपासून बनविल्या जातात पण अशा उदबत्त्यांचा उपयोग आरोग्यासाठी वा मंगलतेसाठी होऊ शकत नाही.

मंगलप्रसंगी वा लग्नकार्यात अत्तरे पाण्यात मिसळून सुगंधित पाण्याचा शिडकावा करण्याच्या पद्धतीमुळे मनाला तर प्रसन्नता येतेच पण याचा उपयोग वातावरणात थंडावा आणण्यासाठीही होतो. लग्नकार्यात प्रेमाने लावलेले अत्तर, शिंपडलेले गुलाबपाणी माणसा-माणसातील प्रेम वाढवून जवळीक वाढवते. गर्दीच्या ठिकाणी दुर्गंध राहू नये व सुगंध पसरावा असा उद्देशही अत्तर-गुलाब करण्यात असतो. सुगंधी पुष्पगुच्छ व आरास करण्याने सगळीकडे सुगंध पसरतोच. गुलाब, वाळा, केवडा, चमेली, जाई, जुई, पारिजातक अशी अनेक प्रकारची अत्तरे उपलब्ध होऊ शकतात व अशा अत्तरांचा उपयोग आरोग्यासाठी व मंगलतेकडे व सकारात्मक शक्‍ती वाढविण्याकडे होतो. संतुलन उत्पादनांतर्फे अशा वस्तू उपलब्ध होण्याकडे पूर्वीपासूनच कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे.

डॉ. श्री. बालाजी तांबे

No comments:

Post a Comment